ब्रेन, बॉडी, माइंडला नेहमी कार्यरत ठेवा प्रमोद अत्तरदे
ब्रेन, बॉडी, माइंडला नेहमी कार्यरत ठेवा प्रमोद अत्तरदे : लेवा पाटीदार मंडळातर्फे सत्कार
ता. 30/06/2023 : उद्योग करायचा असेल, तर त्यात आपला इंटरेस्ट असणे खूप महत्त्वाचे असते. इतरांची कॉपी करून तो होत नसतो. ब्रेन, बॉडी आणि माईंड हे सध्याच्या युगातील प्रॉडक्ट आहेत, त्यांना नेहमी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मूळ जिल्ह्याचे रहिवासी व सध्या अमेरिकेच्या न्यू जर्सीतील उद्योजक प्रमोद अत्तरदे यांनी केले.
सकल लेवा पाटीदार मंडळातर्फे गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात हा सोहळा पार पडला. माजी आमदार निळकंठ फालक अध्यक्षस्थानी होते. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे
होते. व्यासपीठावर पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णाजी खडसे, बंडूदादा काळे, नीता वराडे, डॉ. ज्योती महाजन, निला चौधरी, अॅड. प्रवीणचंद्र जंगले, कु. अनुवा अत्तरदे आदी उपस्थित होते.
प्रमोद अत्तरदे यांचा सत्कार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन झाला. श्री. अत्तरदे यांनी अमेरिकेमध्ये उद्योगांना असलेले अनुकूल वातावरण, तसेच बदलत्या काळानुसार तेथील रोजगार संधी, तिथे येणारे तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ, भारतातील सद्यस्थिती आणि त्याचे सामाजिक पडसाद या विषयांवर मार्गदर्शन केले. अरुण बोरोले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. हेमंत इंगळे यांनी आभार मानले.



